महाराष्ट्र

भालके, आवताडे थकबाकीदार असल्याने उमेदवारी अर्ज रद्द करा; हायकोर्टात याचिका दाखल ;तक्रारदाराची थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव

 

 

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी श्री विठ्ठल ,संत दामाजी या  दोन्ही साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई (मालमत्ता जप्तीची) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पंढरपूर ः महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे या प्रमुख दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार मोहन हळणवर यांनी आक्षेप घेतला आहे. हे दोघे थकबाकीदार असून त्यांचे उमेदवारी अर्ज रद्द करावेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले आहे. या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या उमेदवारीबाबतचा फैसला मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. अॅड. अभिमान हाके यांच्यामार्फत माऊली हळणवर यांनी अपील केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूरच्या जागेवर पोटनिवडणूक लागली असून येत्या 17 एप्रिल रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने त्यांच्या विरोधात समाधान आवताडे यांना मैदानात उतरवले आहे.

भगिरथ भालके हे पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे, तर समाधान आवताडे हे मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही साखर कारखान्यांनी चालू वर्षी गाळप केलेल्या उसाची एफआरपीची रक्कम दिली नाही. ऊस गाळप झाल्यापासून 14 दिवसांच्या आता एफआरपीची रक्कम संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही एफआरपीची रक्कम दोन्ही कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन्ही साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई (मालमत्ता जप्तीची) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

भालके व आवताडे हे दोघेही सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असून ते पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रमुख उमेदवार आहेत. अध्यक्ष असलेल्या त्यांच्या दोन्ही कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाची थकबाकी आहे. त्यामुळे त्यांचे उमेदवार अर्ज रद्द करावेत, अशी तक्रार अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहन ऊर्फ माऊली हळणवर यांनी 31 मार्च रोजी उमेदवारी अर्जाच्या छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका