महाराष्ट्र

कणखर माणदेशी माता गुणाई जानकर यांचे दुःख निधन

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांना मातृशोक

 

 

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर “चांगल काम कर नाही तर मारीन”, अशी आपल्या पुत्रास आज्ञा देणारी कणखर माणदेशी माता गुणाई जानकर होत.

पंढरपूर : पळसावडे (ता. माण) येथील गुणाबाई जगन्नाथ जानकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने आज राहत्या घरी निधन झाले. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या त्या मातोश्री होत.

दादा जानकर, सतिष जानकर, रत्नाबाई वीरकर, महादेव जानकर ही त्यांची मुले आहेत. सतिश जानकर यांना वकिलीचे शिक्षण दिले तर महादेव जानकर यांना अभियांत्रिकीचे शिक्षण दिले. महादेव जानकर यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून व राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापने नंतर महाराष्ट्र राज्यात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध जोरदार रान उठवले. २० वर्षाच्या संघर्षानंतर महादेव जानकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी लाल दिव्याच्या गाडीत न बसता जमिनीवर बसणारी माता म्हणजे गुणाई जानकर. “चांगल काम कर नाही तर मारीन”, अशी आपल्या पुत्रास आज्ञा देणारी कणखर माणदेशी माता गुणाई जानकर होत

गुणाबाई जानकर यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी होय. शिक्षण घेतलेले नसले तरी त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी मोठे योगदान दिले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी मुलांचा संभाळ करून त्यांना उच्च शिक्षित केले. महादेव जानकर यांच्या संघर्षाच्या काळात आईने त्यांना साथ दिली. मुलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुलांना वाचायला मिळावे म्हणून घरातील कागदाचा कपटाही त्या जपून ठेवत.

महादेव जानकर हे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्याशेजारील निवासस्थानी राहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या कष्टाचे चीज झाले, अशीच सर्वांनी भावना त्या वेळी व्यक्त केली होती. महादेव जानकर यांनीही आपल्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात आईचे आशिर्वाद होते, असे आवर्जून सांगत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका