पाटलांची गुगली : कृष्णा-भीमा विकास आघाडी नावाने नव्या राजकीय पक्षाची स्थापना
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याकंडून पक्ष नोंदणीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर .

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याकंडून पक्ष नोंदणीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.
सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेवरील आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोहिते-पाटील परिवाराने कृष्णा-भीमा विकास आघाडी या नावाने नव्या पक्षाची स्थापन केली आहे. या नव्या पक्षाची रितसर नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याकंडून पक्ष नोंदणीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.
विश्वतेजसिंह हे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव आहेत. राजकारणातील त्यांचे ‘लॉंचिंग’ या निमित्ताने करण्याते येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेऊन या आघाडीची स्थापना करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. मोहिते-पाटलांच्या या नव्या राजकीय भूमिकेने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.लोकसभा निवडणुकीआधी मोहिते-पाटील परिवारातील रणजतिसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या सर्व बंधूंनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. मोठ्या हिमतीने रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना खासदार म्हणून निवडून आणले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या राम सातपुते या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला आमदार म्हणून निवडून आणले.
मोहिते-पाटलांचा सारा परिवार भाजपात असताना मोहिते-पाटील यांना नव्या आघाडीची गरज का भासत आहे. याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे या परिवाराचे पालक आहे. त्यांचे चिरंजीव आमदार रणजीतसिंह व परिवारातील अन्य चुलत भावंडांनी भाजपात प्रवेश केला आहे. मात्र, आता मोहिते-पाटलांच्या तिसऱ्या पिढीतील विश्वतेजसिंह मोहिते-पाटील यांनी नव्या आघाडीची सुरवात केल्याने मोहिते-पाटलांची नेमकी भूमिका काय याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मोहिते-पाटील यांच्या या नव्या राजकीय भूमिकेने जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतात. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने या घडामोडींना विशेष महत्व आहे.
लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्यानंतर रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना विधान परिषदेवर आमदार करण्यात आले. संघटनात्मक नेमणुकांमध्ये रणजीतसिंहांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते-पाटील यांना जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस करण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी रणजीतसिंह यांचा चांगला संपर्क आहे. नव्या आघाडीची स्थापना करताना त्यांनी शहा व फडणवीस यांना कल्पना दिली असावी, असेही सांगण्यात येत आहे. या संदर्भात रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.