महाराष्ट्र

राष्ट्रवादीत पदाधिकारी निवडी मोहिते – पाटील यांच्या मर्जीने ; पंढरपूर नंतर माळसिरस मध्येही खदखद

मोहिते-पाटील गटाचे धाईंजे राष्ट्रवादीला चालतात मग राजूबापू पाटील यांचे अतुल खरात का चालेले नाहीत? उत्तम जानकर

 

पदाधिकाऱ्याच्या निवडीवरून राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पंढरपूर : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी निवडीवरून असलेली खदखद आता बाहेर येऊ लागली आहे. माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी त्याला तोंड फोडले असून माळशिरस राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले अक्षय भांड हे मोहिते-पाटील समर्थक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या निवडी ह्या मोहिते-पाटलांना विचारूनच होत असल्याचा दावाही जानकर यांनी केला आहे. अशीच नाराजीची भावना जिल्ह्यातील पंढरपूर सह इतर तालुक्‍यांतही आहे. या नाराजीच्या भावनेतूनच काहींनी प्रदेशच्या नेत्यांकडे राजीनामा देण्याचेही बोलून दाखविले आहे.

विजय देशमुखाच्या निवडीवरून अंतर्गत वाद उफाळला

पंढरपूर तालुक्यात भालके समर्थक असणारे विजय देशमुख यांच्या निवडीनंतर पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याची तक्रार थेट पक्षाच्या निरीक्षककडे केली .जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी जैसे थे ठेवण्याची सांगितले असताना सुद्धा राष्ट्रवादीत चाललेल्या या मनमानीला कंटाळून युवराज पाटील व दीपक पवार यांनी बैठक घेऊन या निवडीवर आक्षेप घेतला आहे
तर भालके कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रवादीची उमेदवारी देऊ नका अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (कै.) राजूबापू पाटील कोणाचे? मोहिते पाटलांचे की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, या प्रश्नाचे उत्तर आजही कोणाकडे नाही. त्याला कारणही तसेच आहे, जे लोक म्हणत होते राजूबापू पाटील हे मोहिते-पाटलांचे आहेत. तेच मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्यानंतरही राजूबापूंनी राष्ट्रवादीची सोबत सोडली नाही. राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र ऍड. गणेश पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवकची धुरा सोपवण्यात आली. जिल्हाध्यक्ष या नात्याने ऍड. गणेश पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी निवडले खरे. पण निवडीमागे डोकं कोणाचे? हा प्रश्न आता समोर आला आहे.

जानकरांचा आरोप

माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नातेपुते येथील अक्षय भांड यांची निवड करण्यात आली आहे. भांड हे मोहिते-पाटील यांचे समर्थक असल्याचा आरोप माळशिरसचे राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी केला आहे. तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या निवडी मोहिते-पाटील यांना विचारूनच होत असल्याचा आरोपही जानकर यांनी केला. मात्र, माढ्याची लोकसभा निवडणूक असो की माळशिरसची विधानसभा निवडणूक अक्षय यांनी राष्ट्रवादीचेच काम केले आहे, असा दावा युवकचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी केला. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतरच पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मंगळवेढ्याचे पद रिक्त का ठेवले?

पदाधिकारी निवडीवरून जशी खदखद माळशिरस तालुक्‍यातील युवक राष्ट्रवादीत आहे, तशीच काहीशी खदखद करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, पंढरपूर या तालुक्‍यातील निवडींच्या बाबतीत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी भालके यांच्या परिवारात मिळेल, असाच सर्वांचा अंदाज आहे. निवडणुकीच्या तोंडावर याच मतदारसंघात येणाऱ्या मंगळवेढ्याचे युवक तालुकाध्यक्षपद का रिक्त राहिले? याचे कोडे सर्वांनाच आहे. या निवडीचा लाभ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला झाला असता तरीही या तालुक्‍यातील निवड मागे ठेवल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

पक्षविरोधात काम करणारे चवरे उपाध्यक्षपदी

मोहोळ तालुक्‍यातून पेनूर येथील सागर चवरे यांची युवकच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. चवरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात काम करूनदेखील त्यांना युवकच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संधी मिळाल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

मुलाखती न देणारे कार्यकारिणीत

युवकसाठी ज्या पदाधिकाऱ्यांनी मुलाखतीच दिल्या नाहीत, त्यांना जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीत संधी मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. युवकच्या पदाधिकारी निवडीमागे कोणाचे डोकं आहे? याची चर्चा जिल्ह्यातील राष्ट्रवादीला अस्वस्थ करू लागली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीतील खदखद पक्षासाठी धोकादायक मानली जात आहे. नाराज कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशच्या नेत्यांकडे धाव घेतली आहे, तर काहींनी राजीनामा देण्याचीही तयारी सुरु केली आहे.

खरातांना उमेदवारी दिली असती तर चित्र वेगळे असते

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसुचित जातीसाठी आरक्षित आहे. दीड वर्षांपूर्वी या पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने माळशिरस तालुक्‍यातील एकेकाळचे मोहिते-पाटील समर्थक असलेल्या त्रिभुवन धाईंजे यांना उमेदवारी दिली होती. या निवडीत राष्ट्रवादीच्या धाईंजे यांचा पराभव झाला. या पराभवाला मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांची बंडखोरी महत्वाची मानली जाते. कै.राजूबापू पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले अतुल खरात यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी असती तर कदाचित जिल्हा परिषदेत आज वेगळे चित्र दिसले असते, असे आजही छातीठोकपणे सांगणारे आहेत. मात्र, मोहिते-पाटील गटाचे सदस्य धाईंजे राष्ट्रवादीला चालतात मग राजूबापू पाटील यांचे अतुल खरात का चालेले नाहीत? हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीतच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका