महाराष्ट्र

बारामतीत शेतकरी संघटना महावितरण विरोधात ठोकणार बोंब ; सोमवारी ऊर्जा भवनावर आंदोलन

शेतकऱ्यांना लाखों रुपयांची दिलेली खोटी वीजबिल रद्द करा

 

विजबिल प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असूनही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित न करण्यासाठी आंदोलन

बारामती : महावितरण कंपनीने राज्यातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. अनेक भागात शेतकऱ्यांची कृषिपंपास लागणारी लाईट सोडवण्यात आली आहे. याच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली असून सोमवारी २२ मार्च रोजी बारामती येथील ऊर्जा भवनावर बोंबाबोंब आंदोलन केले जाणार आहे.

हे आंदोलन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. शेतकऱ्यांना लाखों रुपयांची खोटी वीजबिल दिली आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेकडून केला जात आहे.

तसेच शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी बारामती येथील ऊर्जा भवन येथे उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेकडून सध्या सुरू आहे. ‘विद्युत पुरवठा खंडित करण्यात यावा असा कोणताही अध्यादेश नाही. ध चा म चालू आहे’, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष हनुमंत वीर यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांकडे वीजबिल थकबाकी असून ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणाकडून कडक पाऊले उचलली जात आहेत. शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करण्यासाठी त्यांचा कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या विजबिलाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही शेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबिल वसुली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी संघटना याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका