महाराष्ट्र

उमेदवारी द्या अन्यथा प्रस्थापितांना विस्थापित करणार -धनगर समाजाचा सर्वपक्षीय नेतृत्वांना इशारा

पंढरपूर मधील ठिणगीचे रूपांतर राज्यभरात वणव्यात होईल-समाजाचे सुचक विधान

 

 

महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचाच्या वतीने बैठकीचे आयोजन

पंढरपूर -पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांमधील आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये जर धनगर समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली तरच तो उमेदवार विजय होईल. अन्यथा प्रस्थापितांना विस्थापित करू असा इशारा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला

महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचाच्या वतीने आयोजित पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीबाबत धनगर जमातीमधील विविध सामाजिक संघटनांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध राजकिय पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या धनगर जमातीच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक श्रीमंत होळकर वाडा येथे करण्यात आली होती.

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी विशेष बैठक घेण्यात आली.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये धनगर समाजाचे प्राबल्य आहे. गेल्या अनेकवर्षापासून धनगर समाज या मतदार संघामध्ये विविध राजकिय पक्षांना मतदान करत आलेला असून ते उमेदवार धनगर समाजाने निवडून आणलेले आहेत. परंतु यामध्ये धनगर समाज सत्तेपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे समाजाने या राजकिय पक्षांकडे उमेदवारी मागण्याचा एकमुखी निर्णय घेतलेला आहे.
सध्या वंचित बहुजन आघाडी, मनसे, शेतकरी संघटना, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, एम.आय.एम. व भारत मुक्ती मोर्चा या पक्षांशी आमची चर्चा सुरु आहे. मात्र धनगर समाज हा प्रस्थापित राजकिय पक्षांचा कायम मतदार राहिला आहे. त्यामुळे प्रमुख प्रस्थापित पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यास प्राधान्य दिले जाईल. विशेषत: राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व भारतीय जनता पक्ष यांनी आमच्या समाजाला उमेदवारी दिली पाहिजे. त्यांनी जर उमेदवारीमध्ये समाजाला डावलले तर मात्र धनगर समाज स्वस्थ बसणार नाही. निश्चितच या प्रस्थापित पक्षांना विस्थापित करण्याची भूमिका घेतली जाईल.व त्याचे गंभीर परिणाम या राजकिय पक्षांना राज्यभरात भोगावे लागतील.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात पडलेल्या ठिणगीचे रूपांतर मोठ्या वनव्यात होऊन हे प्रस्थापित पक्ष विस्थापित करण्याची ताकत धनगर समाजामध्ये आहे हे दाखवून दिले जाईल.बहुसंख्येने असणारा धनगर समाज समाज हा कायमच प्रस्तापित पक्षाच्या उमेदवाराला आज पर्यंत मतदान करीत आला आहे. मात्र उमेदवारी देताना आमच्या व्यक्तीचा कधीही विचार केला जात नाही. कायमच दुजाभावाची वागणूक दिली जाते.सत्तेतील दुय्यम असणारे पद देऊन समाजाची दिशाभूल केली जाते. नाव घेताना शाहू,फुले, आंबेडकरांचे घ्यायचे मात्र वागणूक वेगळीच द्यायची हे आता धनगर समाजाने ओळखले आहे. आता समाज या सर्व पक्षांच्या फसवेगिरी ला भुलणार नाही त्यासाठी मतदार संघातील सर्व ओबीसी घटकांना सोबत घेऊन लढा यशस्वी करणार असा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला.यावेळी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच चे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका