महाराष्ट्र

“जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा -फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

३०९०० जणांचे प्राण वाचवता आले असते जर…

 

काय काय घोटाळे सांगायचे -निविदा न मागवता गाद्या, उशा, सलाइन यांवर ६० लाख रुपये खर्च केले. १२०० रुपयांचं थर्मामीटर ६५०० रुपयांत खरेदी केली. २ लाखांच्या बेडशीटसाठी ८.५ लाख भाडं दिलं. पंख्याचं ९० दिवसांचं भाडं ९ हजार दिलं. हजार प्लास्टिक खुर्च्यांचं भाडं चार लाख रुपये. लाकडाचे १५० टेबलचं भाडं सहा लाख ७५ हजार रुपये. असंही फडणवीस म्हणाले.

मुंबई :- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. विधासभेच्या सभागृहामध्ये सरकारवर हल्लाबोल करताना फडणवीस यांनी करोनाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याचे आरोप केले आहेत. महाराष्ट्र सरकारला करोना रुग्णांची संख्या अटोक्यात ठेवायला अपयश आल्याचे सांगत योग्य नियोजन केले असते तर राज्यामधील ३० हजार रुग्णांचे प्राण वाचू शकले असते असंही फडणवीस म्हणाले आहेत.
“कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी केली असती तर राज्यातील ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी असते. तसेच करोनामुळे मरण पावलेल्या ३० हजार ९०० करोना रुग्णांना महाराष्ट्र वाचवू शकला असता असं अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचं?”, असा प्रश्न फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला. तसेच पुढे बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.
“आम्ही सगळ्यात मोठं रुग्णालय विक्रमी वेळेत बांधल्याचं सांगण्यात आलं, पण यात विक्रमी भ्रष्टाचारदेखील झाला. निविदा न मागवता गाद्या, उशा, सलाइन यांवर ६० लाख रुपये खर्च केले. १२०० रुपयांचं थर्मामीटर ६५०० रुपयांत खरेदी केली. २ लाखांच्या बेडशीटसाठी ८.५ लाख भाडं दिलं. पंख्याचं ९० दिवसांचं भाडं ९ हजार दिलं. हजार प्लास्टिक खुर्च्यांचं भाडं चार लाख रुपये. लाकडाचे १५० टेबलचं भाडं सहा लाख ७५ हजार रुपये. काय काय घोटाळे सांगायचे,” असंही फडणवीस म्हणाले. तसेच “जम्बो कोविड सेंटरच्या घोटाळ्याची पुस्तिका तयार केली असून मुख्यमंत्र्यांनाही देणार आहे. हा रेकॉर्ड वेळेतील भ्रष्टाचार आहे,” असा आरोप फडणवीसांनी केला. मृतदेहांच्या बॅग, पीपीई किटचाही घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केली. घोटाळा समोर आणला तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी या शब्दाचा अर्थ कळेल अशी टीका त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका