कुडनूर गावी प्राचीन शिलालेखाचा शोध
प्राचीन इतिहासावर अधिक प्रकाश पडेल. इतिहास अभ्यासक -मधुकर हाक्के

जत: जत तालुक्यातील कुडनूर गावी नवीन प्राचीन शिलालेख आढळला आहे. इतिहास अभ्यासक श्री मधुकर हाक्के हे सहा महिन्यांपूर्वी भटकंती करत असते वेळेस त्यास कुडनूर गावात हनुमान मंदिर शेजारी हा शिलालेख आढळून आला. याव्यतिरिक्त येथे काही वीरगळ व गजलक्ष्मी शिल्प आहेत. यावरून कुडनूर गावच्या प्राचीन इतिहासात भर पडण्यास मदत होणार आहे. जत तालुक्यातील पूर्व भागात वळसंग , उमराणी इ गावात प्राचीन शिलालेख मिळाले होते व जत तालुक्याच्या इतिहासात मोलाची भर पडली अशाच प्रकारचा शिलालेख कुडनूर गावी सापडला आहे. हा शिलालेख हळेकन्नड लिपीत असून 10 ओळींचा आहे. हा एक दान शिलालेख असून यात काळाचा उल्लेख नसून तो लिपिवरून 12 व्या शतकातील असावा. नंदीगाव येथील सिंगगोप्पच्या श्री सादेश्वर व त्रिंबकेश्वर देवांना शेती दान स्वरूपात दिली असल्याचे समजते. नंदीगाव असा ग्राम नामाचा उल्लेख आला आहे. शिलालेखावर सूर्य, चंद्र, खडग व गाय यांचे अंकन आहे. सध्या गावात प्राचीन शिवमंदिर आढळत नाहीत.
कुडनूर येथे हा शिलालेख उपलब्ध झाल्याने प्राचीन इतिहासावर प्रकाश पडला असून लवकरच याविषयी अधिक संशोधन करून सविस्तर शोधनिबंध सादर करणार असल्याची माहिती पंढरी दर्पण शी बोलताना श्री हाक्के यांनी दिली.