ग्रामीण महाराष्ट्र

मला नक्षलवादी व्हायचंय, हवालदिल शेतकऱ्याचं तहसीलदाराकडे निवेदन

नक्षलवादी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागितली परवानगी

 

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावचे शेतकरी नामदेव पतंगे यांनी नक्षलवादी होण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे

हिंगोली : “मुख्यमंत्री महोदय तुमच्या शासन व्यवस्थेने आमच्या अंगाच्या चिंधड्या करून ठेवल्या” असे उद्विग्न वाक्य लिहुन शेतीतील समस्यांनी त्रस्त झालेल्या हिंगोलीच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्याची परवानगी मागितलीय. मुख्यमंत्र्यांच्या नावे एक पत्र लिहुन त्याने आपली कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय.

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील टाकतोडा गावचे शेतकरी नामदेव पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हंटले आहे. माझे वडील, माझे आजोबाही शेतीच करायचे. मग आमचा वडिलोपार्जित व्यवसाय जर शेती असेल तर आम्हाला एक वर्षीचा दुष्काळ का सहन होऊ नये? मुख्यमंत्री महोदय तुमच्या शासन व्यवस्थेने आमच्या अंगाच्या चिंधड्या करून ठेवल्या. तुम्ही कर्जमाफी दिलीत पण ती आमच्यापर्यंत पोचलीच नाही, तुम्ही योजना आणली पिकेल ते विकेल पण आमच्याकडे पिकलंच नाही तर विकावं काय? तुम्ही पिकलं नाही म्हणुन अनुदान दिलंय. पण नुकसान एक हेक्टर आणि मदत नऊ हजार. तुमचे लाईनमन दादागिरी करायला लागेलत, न सांगताच लाईन कापत आहेत. तुमच्या बँका अजुनही शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी तरी द्या. तुमच्या महाराष्ट्रातील एक अभागी शेतकरी, नामदेव पतंगे. अशा आशयाचे पत्र हे नामदेव पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. ही कैफियत केवळ माझीच नसुन माझ्यासारख्या हजारो तरुणांची असल्याचे त्यांनी म्हटले आहे

शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असून प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पतंगे यांनी दिलेल्या निवेदनातून केलाय. बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. शेतकऱ्याचं नुकसान होऊन ही पीक विमा मिळत नाही. कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नसल्याचा आरोप या शेतकऱ्याने केलाय.

शासकीय यंत्रणेला याबाबत काही विचारणा केली असता, शासकीय यंत्रणा मात्र 353 कलमान्वये शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करतो, अशा धमक्या देत असल्याचंही त्यांनी या निवेदनातून म्हटलंय. शेतकऱ्यांचे आंदोलने उपोषण मागण्यांकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा गंभीर आरोप या शेतकऱ्याने केलाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका