‘विठ्ठल’ कारखान्याचे वाटूळं केलं अन् आता यांना विठ्ठल परिवाराची साथ पाहीजे ! आमदारकीच्या आडून कारखानदारीचे ‘चांगभले’

पंढरपूर राजकारण

 

साडेनऊ वर्षे आम्हाला दूर लोटले होते !

शिंदे पितापुत्राबद्दल विठ्ठल परिवारात खदखद

पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर-माढा विधानसभा मतदार संघातून पुन्हा यावेळीही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात आ.बबनराव शिंदे उतरले आहेत.यावेळी ते पक्ष बदलणार असा ठाम विश्‍वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात होता.भारतीय जनता पक्षात प्रवेेश करणार असल्याच्या बातम्याही माध्यमामधून प्रकाशित झाल्या होत्या.तर आ.शिंदे हे राष्ट्रवादीच्या सर्वच सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर रहात असल्याचे दिसून येत होते.पक्षाचे नेते अजीत पवार यांच्या सोलापूर दौर्‍यावेळीही ते सोबत नव्हते तर सोलापूर येथील शरद पवार यांच्या बैठकीस देखील त्यांंनी दांडी मारली होेती.बबनराव शिंदे हे पक्ष सोडणार हे निश्‍चित मानले जात असतानाच भाजपाकडून शिंदेबंधुना रेड सिग्नल दाखविण्यात आल्याच्या बातम्या प्रकाशित होऊ लागल्या आणि शिंदे समर्थकांची गोची झाली होती.अशातच ना.तानाजी सावंत यांनी काहीही झाले तरी माढा विधानसभा मतदार संघ शिवसेना सोडणार नाही अशी भुमिका घेतली आणि आ.बबनराव शिंदे यांना पुन्हा राष्ट्रवादीच्या दारात तिकीटासाठी उभे रहावे लागले.आता ते राष्ट्रवादी कॉग्रेसकडून निवडणूक लढवित असले तरी या वेळी त्यांच्या समवेत 42 गावात पांडुरंग परिवार नाही आणि आ.भालके यानी राष्ट्रवादीॅत प्रवेश केल्याने त्यांची मदार आता विठ्ठल परिवारावरच आहे.गेल्या दहा वर्षात आपण 42 गावात खुप विकास कामे केली असा दावा आ.शिंदे यांच्याकडून केला जात असला तरी या पैकी झालेली बहुतांश कामे ही शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि प्रत्येक मतदार संघात शासनाने आमदार कोण आहे हे न पाहता योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी निधी दिला आहे.2014 नंतर तर राज्यात भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेवर आले आणि या 42 गावातील पांडुरंग परिवाराच्या नेत्यांनी आपल्या गावचे बहुतांश प्रश्‍न हे आ.प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून पाठपुरावा करुन सोडवून घेतले आहेत अशीच प्रतिक्रिया आ.बबनराव शिंदे यांच्या विरोधातील उमेदवार संजय कोकाटे यांच्या प्रचारात सहभागी झालेले पांडुरंग परिवाराचे नेते व्यक्त करीत आहेत.
तर आ.बबनराव शिंदे यांच्या विरोधात विठ्ठल परिवारातही तोच सुर आळवला जात आहे. विठ्ठल परिवारातील एका जुन्या जाणत्या सभासदाने या बाबत केलेले वर्णन अतिशय महत्वपुर्ण व विठ्ठल परिवाराच्या डोळयात अंजन घालणारे आहे.
2009 च्या आमदारकीच्या निमित्ताने बबनराव शिंदे यांनी 42 गावात लक्ष घालण्यास सुुरुवात केली या भागात फेरफटका मारत असताना नदीकाठच्या गावातील मळईच्या उसाचे प्रचंड क्षेत्र पाहून आमदारकीबरोबरच या भागातील अधिक उतारा देणारा ऊस आपण नेवू शकतो याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी अतिशय शिस्तबध्दतेने येथील बडे बागायतदार जवळ करण्यास सुरुवात केली. पण पांडुरंग परिवारातील कट्टर परिचारक समर्थक मात्र या ऊसाच्या राजकारणास बळी पडले नाहीत मात्र याच वेळी विठ्ठल सहकारी साखर कारखाना मात्र या ऊस पळवापळवीच्या राजकारणात अडचणीस तोंड देवू लागला.पांडुरंग परिवारातील ऊस उत्पादक बधत नाहीत म्हणल्यावर विठ्ठल परिवारातील ऊस उत्पादकांना गळाला लावण्याचा यशस्वी प्रयत्न होऊ लागला.ऍडव्हान्सच्या माध्यमातून व्युहरचना केली जावू लागली.जसजसा या भागातील ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे गाळपास जावू लागला तस तसे आपल्या तालुक्यातील हक्काचा ऊस गाळपासाठी आणखी कारखाने उभारणे गरजेचे आहे हे ओळखून खाजगी कारखान्याची उभारणी केली जावू लागली.
आणि इकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उतार्‍यात फरक पडू लागला.मळईच्या क्षेत्रातील नदीकाठच्या पटटयातील भरपूर पाण्याचा ऊस पध्दतशीर माढा तालुक्यात नेला जात असल्याने विठ्ठल कारखान्याचे गाळप घटत गेले.कारखान्याच्या गळीत हंगामाचा खर्च तेवढाच,कामगारांच्या पगारी तेवढ्याच पण उतारा देणारा ऊस लंपास होउ लागल्याने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास फटका बसू लागला.ऍडव्हान्स आणि पन्नास-शंभर रुपये जास्तीचे बील यामुळे या 42 गावातील ऊस उत्पादक आपला ऊस माढयाकडे पाठवण्यास तयार होऊ लागले पण पंढरपूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा राजवाडा समजला जाणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना शिंदेपितापुत्रांच्या राजकारणात अडचणीत येईल अशी शक्यता काही वर्षापुर्वीच व्यक्त केली होती अशी प्रतिक्रीया यावेळी व्यक्त केली.
गेल्या दहा वर्षापासून आ.बबनराव शिंदे,संजय शिदे आणि पंढरपूर तालुकयातील परिचारक हे हातात हात घालून जिल्ह्याचे व तालुक्याचे राजकारण करीत आले आहेत.आणि 42 गावात राजकारण करताना आ.बबनराव शिंदे यांनी सदैव पांडुरंग परिवारातील नेते आणि परिचारक समर्थक यांनाच प्रथम प्राधान्य दिले.सन्मान दिला असा अनुभव विट्ठल परिवारातील अनेक गावपुढार्‍यांना आला आहे.गेल्या साडेनऊ वर्षात परिचारक गटास प्रथम प्राधान्य दिले गेले आणि आता परिचारक गट महायुतीच्या प्रचारात आहेत. लोकसभा निवडनुकीवेळी काही ठराविक गावातून संजय शिंदे यांना लिड मिळाले खरे पण त्यातही खर्‍या अर्थाने वाटा होता तो विठ्ठल परिवाराचा आणि विठ्ठल परिवाराची शरद पवार या नावावर असलेल्या श्रध्देचा पण बबनराव शिंदे यांच्या पुत्रास 42 गावे आपल्या मुठीत असल्याचा भ्रम झाला आहे अशीच प्रतिकिेया यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळीही आ.बबराव शिंदे हे सहाव्यांदा आमदार होण्यासाठी म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.सरकारच्या माध्यमातून आमदार म्हणून ते काही विकास कामे मंजूर करून आणतीलही आणि जनमताचा रेटा म्हणून काही कामे त्यांना करावीच लागणार आहेत पण या तालुक्यत राजकारण करताना ऊसाच्या माध्यमातून पध्दतशीरपणे फायदा करुन घेत आहेत.ही निवडणुक लढविण्यामागे त्यांचा हाही एक हेतू आहे अशीच प्रतिक्रिया यावेळी विठ्ठल परिवारातील जेष्ठ सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *