फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होवू नये म्हणून शेतकऱ्याचा नवस ; रूपाभवानी ते तुळजापूर दंडवत

पंढरपूर

 

तीन वर्ष अनवाणी फिरत होता शेतकरी

पंढरपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असताना वारंवार विनंती करून आणि आत्मदहनाचे इशारे देऊन देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट न दिल्याने एक शेतकरी आई तुळजाभवानीला नवस बोलून तीन वर्षांपासून अनवाणी फिरत आहे. अनिल आबाजी पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून फडणवीस सरकार पडल्यावर आपण अनवाणी चालत देवीच्या दर्शनाला येऊ आणि मगच चप्पल परिधान करू, असा नवस त्यांनी केला होता.
अनिल पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे राहतात. ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील काम बघतात, अशी माहिती त्यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. ते स्वत: शेतकरी असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम झगडत असतात, अशी माहिती त्यांनी दिली. फडणवीस सरकाराने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. या पत्रात ते म्हणातात की ‘सन 2015-16 मध्ये मी दुष्काळी परिस्थितीत 10 गावातील 1100 जनावरांसाठी तीन महिने स्वखर्चाने चारा छावणी सुरू केली होती. त्या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांना भेट मागितली असता त्यांनी मला एकदाही भेट दिली नाही. मी आत्मदहनाचा इशारा देऊन देखील त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून तुळजापूर येथील तुळजाभवानीला नवस केला होता. त्यादिवसापासून आजपर्यंत मी पायात चप्पल घातली नाही’. याबद्दल अधिक माहिती देताना ‘तब्बल तीन वर्षांनी आई तुळजाभवानीने माझ्या नवसाला कौल दिला असून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले आहे’, असं पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे.
फडवीस हे पायउतार झाल्यानंतर सोलापूर येथील रुपाभवानी ते आई तुळजाभवानी तुळजापूर येथील मंदिरापर्यंत एका आमदाराच्या नावाने एक 165 आमदारांच्या नावाने 165 वेळा दंडवत घालत तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मातेच्या मंदिरात महाराष्ट्र विकास आघाडीच्या नविन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर माझा नवस फेडणार आहे, असंही त्यांनी या चिठ्ठीत म्हटलं आहे. होणारे नविन मुख्यमंत्री राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *