शिवाजीराव काळुंगे यांची उमेदवारी कायम ; काँग्रेसच्या चिन्हावरच लढणार

पंढरपूर

 

अर्ज मागे घेण्याचा आदेश खरा कि खोटा ,पत्त्यामुळे संशय ?
मंगळवेढा (प्रतिनिधी) ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी काँग्रेस पक्षाच्यावतीने अर्ज दाखल केला असून आघाडी धर्म पाळावा म्हणून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले. तसा लेखी आदेशही प्रा.काळुंगे यांच्या निवासस्थानापर्यंत येवून पोहचला मात्र काळुंगे नॉट रिचेबल असल्याने तो आदेश त्यांना मिळाला नसून वेळेत बी फॉर्म सादर केलेले प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा अर्ज वेळेत न निघाल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली असून कार्यकर्ते आता प्रचाराच्या कामाला लागले आहेत.
दरम्यान, मंगळवारी सकाळी 9 वाजता काँग्रेस-राष्ट्रवादी-आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार महाआघाडीचे उमेदवार म्हणून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे.
पंढरपूरातून काँग्रेस पक्षाने प्रा.काळुंगे यांना तर राष्ट्रवादीने आ.भारत भालके यांना उमेदवारी दिली. काळुंगे मागे हटण्यास तयार नव्हते म्हणून राष्ट्रवादीने सोलापूर मध्य मतदारसंघात जुबेर बागवान यांची उमेदवारी दाखल करून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रा.काळुंगे हे सुशिलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे शहर मध्य मध्ये नाक दाबल्याशिवाय पंढरपूरचे तोंड उघडणार नाही अशी क्लृप्ती राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्‍याने काढली होती मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. प्रा.काळुंगे रविवारपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांना अनेकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. लोकेशन तपासले. मात्र काहीही थांगपत्ता लागला नाही.
स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व उमेदवारांनी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकार्‍यांवर दबाव आणला. सोमवारी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गणेश कुलकर्णी यांच्या सहीचा आदेशही एका अतिउत्साही कार्यकर्त्याने आणला व राष्ट्रवादीच्या समर्थकामार्फत तो आदेश सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला. त्यात अ‍ॅड.गणेश पाटील यांनी प्रा.काळुंगे यांना पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज त्वरीत मागे घ्यावा असा आदेश काढला होता मात्र प्रा.काळुंगे मंगळवेढा तालुक्यातील आहेत हे ते विसरले व त्यांनी सोलापूर जिल्ह्याऐवजी कोल्हापूर जिल्हा असा उल्लेख केला त्यामुळे हा आदेश खरा की खोटा ? अशी चर्चा सोशल मिडियावर रंगली. याशिवाय प्रदेशाध्यक्षांच्या सहीने हा आदेश आला असता तर प्रा.काळुंगे यांनी विचार केला असता. असेही काळुंगे समर्थक बोलु लागले. सदरचा आदेश जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे हे बजावण्यासाठी मंगळवेढा येथे दुपारी दीड वाजता आले मात्र प्रा.काळुंगे यांच्या घरी त्यांच्या मुली उपस्थित असल्यामुळे नागणे हे रिकाम्या हाताने परत गेले. एकंदर नाटयमय अशा घडामोडीचा, विविध अफवांचा व नुसत्या पोकळ चर्च्यांचा सोमवार ठरला.
आता आमदार भारत भालके यांचा सामना प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचेसोबत होणार आहे. आमदार भारत भालके हे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत तर प्रा.काळुंगे हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असून मतदारसंघात प्रचार सभा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते येणार हे निश्चित आहे. मात्र काळुुंगे यांच्या सभेसाठी काँग्रेसचे नेते सभा घेणार की 45 वर्षे तळमळीने काम करणार्‍या सच्चा कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडून अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करणार ? हे आता लवकरच समजणार आहे.
दरम्यान,पक्षाने ऐनवेळी हात वर केले असले तरी प्रा.काळुंगे यांचे चिन्ह हे हाताचा पंजाच हेच राहणार असल्याने सच्चा काँग्रेसप्रेमीतून प्रा.काळुंगे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *