‘वंचित’ हाती सत्ता द्या – एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणार : प्रकाश आंबेडकर ; धनगर आरक्षण हक्क मेळाव्यात घोषणा

पंढरपूर

धनगर जमातीच्या विकासाचा जाहिरनामा प्रकाशीत

लातूर : सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली ही सत्ता आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रश्नाच्या पाठीमागे उभे राहणारे सत्ताधारी हवेत. म्हणून वंचितच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने आयोजित धनगर आरक्षण हक्क मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अ‍ॅड. अण्णाराव पाटील, प्रा. सुभाष भिंगे, प्रा. यशपाल भिंगे, अ‍ॅड. मंचकराव डोणे, सुभाष माने,अमोल पांढरे,बाळासाहेब बंडगर सह राज्यभरातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणाला आपण पाठिंबा दिला होता, तेव्हा अनेकांनी या समाजाला आरक्षणाची गरज काय, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा आरक्षण मिळाल्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागतील, असे कोणाला वाटत असेल तर आरक्षण दिले पाहिजे ही आपली भूमिका होती. एकदा आरक्षण दिले. आता नव्या विषयाची चर्चा केली जाऊ शकते. आदिवासी मंडळींना आपल्या आरक्षणात कोणाची आडकाठी येईल असे वाटत होते तेव्हा त्यांच्या मेळाव्यात जाऊन शासनाने नव्याने सुरू केलेली डीटीएच शिष्यवृत्ती योजना बंद व्हावी, अशी त्यांची मागणी होती. या नव्या योजनेत थेट पैसे खात्यावर दिले जातात. हे पैसे खर्च कसे करायचे हे समजत नसल्याने त्या मुलांचे शिक्षण बंद पडले आहे.
नव्याने आपले सरकार आल्यानंतर वसतिगृहाची जुनी योजना सुरू ठेवली जाईल असे मी त्यांना सांगितले आहे. धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न हा फार मोठा नाही.
सर्वानी संघटितपणे एकत्र उभे राहिले तर हा प्रश्न मिटेल. राज्यात विधानसभेत २८८ आमदारांपैकी केवळ सहा-सातजणच धनगर समाजाचे आमदार राहिले, त्यामुळे प्रश्न मार्गी लागला नाही. धनगर समाजाच्या आमदारांबरोबर या प्रश्नाच्या पाठीशी राहणारे सरकार सत्तेत आले पाहिजे. त्यासाठी सर्वानी कटिबद्ध होण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले.

यावेळी धनगर जमातीच्या विकासाचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला.
एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणार .
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करणार .
पारंपारिक शेळी मेंढी पालन व्यवसायाचे संवर्धन करून या व्यवसायासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देवू, लोकर, मांस, मूत्र आणि लेंडी विषयक उद्योगांना चालना दिली जाईल.
शेळी-मेंढी पालन व्यवसायावर आधारित उद्योगधंद्यांना विना तारण कर्जे उपलब्ध करून देवू.
मेंढी पालन व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी मेंढपाळांना ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क यासारख्या देशात पाठवले जाईल.
चराऊ कुरणे आरक्षित केली जातील.
धनगर वाडा – वस्ती सुधार योजना सुरू करून भरीव आर्थिक तरतूद करण्यात येईल.
बिरोबा, खंडोबाच्या धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात येईल तसेच जत्रांसाठी विशेष अनुदानाची तरतूद केली जाईल.
प्रत्येक जिल्ह्यात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे निर्माण केली जातील.
मेंढपाळालावरील हल्लेप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट सारखे कठोर कायदे केले जातील. होळकरशाहीची ऐतिहासिक स्मारके जतन करण्यासाठी विशेष अनुदाने देण्यात येतील तसेच होळकर इतिहास परिषदेची स्थापना केली जाईल.
महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या वाफगाव येथील किल्ल्याचे राष्ट्रीय स्मारकामध्ये रूपांतर करण्यात येईल
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील आद्य क्रांतिकारक, महाराजा नवसाजी नाईक यांच्या नावाने मराठवाडा इतिहास संशोधन केंद्र सुरू केले जाईल.
थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या नावाने कृषी सुधार योजना आणून त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली जाईल.
भारताच्या आद्य महिला स्वातंत्र्यसेनानी भिमाबाई होळकर यांच्या नावाने महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यात येईल.
धनगर जमातीमधील पारंपारिक लोककलांचे संवर्धन करून कलाकारांसाठी मानधन आणि पेन्शन योजना सुरू केली जाईल.
वरीलप्रमाणे धनगर जमातीच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *