बाजार भरला ; सर्जाराजाचा साज मात्र महागला ; दुष्काळाच्या सावटाखाली शेतकऱ्यांना पोळा साजरा करण्याचे आव्हान

पंढरी दर्पण

“साखर कारखानदारांनी  केली बिलाची परंपरा खंडित” !
शेतकरी अनुउत्साही ,साहित्य  दिड पटीने महागले
पंढरपूर : दुष्काळाचे गडद सावट , पाण्याची तीव्र टंचाई ,अस्मानाला भिडलेली महागाई आणि पशुधनाला खाऊ काय घालावे या चिंतेने ग्रासलेल्या बळिराजाला उद्याचा पोळासण छातीवर दगड ठेवूनच साजरा करण्याची वेळ आली आहे. ज्याच्या जिवावर शेतमळा फुलवितो त्या सर्जाराजाचा पोळा सण ,बैल सजविण्याच्या वस्तुनी बाजार भरला असला तरी उठावच नाही.अवघ्या एक दिवसावर पोळा सण आलेला असतानाही शेतकरी वर्गात काहिसा अनुउत्साहाचे वातावरण आहे.
पोळासण म्हणजे बळिराजा साठी आनंदाची पर्वणी समजला जाणारा सण, आपल्या शेतीत दिवसरात्र काबाडकष्ट करून झिजणार्या बैलाचे ऋण फेडण्याचा दिवस .शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस . नेहमीप्रमाणे पंढरपूर शहरातील बाजारपेठ सजली आहे.मात्र शेतात राबणाऱ्या बैलांना सजविण्यासाठी आवश्यक साहित्याच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत दिड पट वाढ झालेली आहे.शेतकऱ्यांनी हि महागाई आंनदाने सहनही केली असती परंतु यंदा परिस्थिती वेगळी आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झालेला आहे.नागरिकांना भटकंती करून तहान भागवावी लागत आहे.तर जनावरांना चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना वाढत्या महागाईत आणि दुष्काळाच्या सावटाखाली सण साजरा करावा लागत आहे. त्यामुळेच शेतकरी साध्यापद्दतीने पोळासण साजरा करण्याच्या तयारीत दिसत आहेत.
यापूर्वी पोळासण आला की शेतकऱ्यांना ऊस बिलाचे वेध लागायचे . या येणाऱ्या पैशावर पोळासण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे, परंतु गेल्या काही वर्षीपासून हि परंपरा कारखानदारांनी खंडित केली आहे.त्यामुळे बाजारपेठत शांतता असल्याचे दिसून येते. सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे २१३ कोटी इतकी एफआरपीची रक्कम अद्याप थकीत आहे. याबद्दल कारखानदार बोलायला तयार नाहीत. अशा अडचणींना तोंड देत शेतकरी साध्यापद्दतीने सण साजरा करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *