राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेंनी मागितली भाजपकडे उमेदवारी ?

पंढरी दर्पण

 

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी रात्री उशिरा पणन मंत्री तथा भाजपचे सोलापूरचे निरीक्षक राम शिंदे यांची सोलापुरात भेट घेतली

श्री. राम शिंदे हे भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापुरात आले होते. तर बबनराव शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने उमेदवारी मागितली असल्याची जोरदार चर्चा सोलापुर जिल्ह्यात सुरू आहे.

भाजपने आज जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. दिवसभर पक्षातील आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती दिल्या. हॉटेल लोटस येथे दिवसभर सुरू असलेल्या या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे उपस्थित झाले नव्हते मात्र रात्री आठच्या नंतर त्यांनी राम शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मागील आठवड्यात बबनराव शिंदे व त्यांचे बंधू जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजय शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच आज श्री शिंदे यांनी राम शिंदे यांची भेट घेतल्यामुळे त्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *