सदाभाऊंच्या जावयाने केला ‘कडकनाथ’ घोटाळा : मा.खा. शेट्टी ; रयत क्रांती संघटनेचा युवा आघाडीचा अध्यक्ष कंपनीचा मालक

पंढरी दर्पण

 

रयत क्रांती संघटनेचा युवा आघाडीचा अध्यक्ष कंपनीचा मालक

कोल्हापूर : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या अमिषाने कोट्यवधी रूपयांची फसवणूक केलेली संस्था ही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. ते पुढे बोलताना म्हणाले कि,
सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ऐकून होते, पण 70 रूपयांला एक अंडे हे मी पहिल्यांदाच ऐकतो. पण हे अंडे देणाऱ्या कोंबड्या गेल्या कुठे ? का त्याही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झाल्या हे पहावे लागेल, असा टोलाही श्री. शेट्टी यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, पूरग्रस्तांचे वेळेत पुनर्वसन व त्यांना तातडीची मदत मिळावी या मागणीसाठी उद्या (ता. 28) संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही श्री. शेट्टी यांनी यावेळी दिली.

कडकनाथ अपहार प्रकरणी श्री. शेट्टी म्हणाले,”ज्या सांगलीतील कंपनीने ही फसवणूक केली आहे, त्याचा मालक हा राज्यमंत्री खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा युवा आघाडीचा अध्यक्ष आहे. कंपनीचे नांवही रयत या नावावरूनच दिले आहे. अलिकडेच संबंधित कंपनीच्या मोहिते नावाच्या मालकाचा विवाह श्री. खोत यांच्या पुतणीशी झाला आहे. श्री. खोत यांनीही यावर अजून तरी खुलासा केलेला नाही किंवा ते हे टाळूही शकत नाहीत. यावरून ही कंपनी श्री. खोत यांच्याशी संबंधित आहे. कृषी विभागाकडून या व्यवसायावर 50 टक्के अनुदान मिळवून देण्याच्या अमिषाने ही फसवणूक झाली आहे. त्यामुळे या कंपनीला राजकीय आश्रय आहे. अशा गंडवागंडवी करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत यासाठी दोन दिवसांत पोलीस अधीक्षकांचीही भेट घेणार आहे.’

विधानसभेला आघाडी कोणाशी करायची याची चर्चा महापुरामुळे थांबली आहे असे सांगून श्री. शेट्टी म्हणाले,”राज्य बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी सरकारने नेहमीच बोटचेपी भुमिका घेतली. ज्यांच्यावर हे आरोप आहेत, त्यापैकी अनेक जण आज भाजपा किंवा शिवसेनेते गेले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या या गुन्ह्याच तपास पोलिसांनी नि:पक्षपातीपणे करून “दूध का दूध, पाणी का पाणी’ करावे.असे ही त्यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *